सामाजिक

आशा,अंगणवाडी कार्यकर्त्यीना स्वयंसेवक नव्हे तर कामगाराचा दर्जा द्यावा –भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव यांची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी

देशभरात कार्यरत असलेल्या आशा,आशा स्वयंसेविका,  अंगणवाडी कार्यकर्त्या,सहाय्यीकांना केवळ ‘स्वयंसेवक’ म्हणून न वागवता त्यांना कामगाराचा दर्जा देऊन विद्यमान श्रम कायद्यां नुसार मानधन व सामाजिक सुरक्षा देण्यात यावी,अशी ठाम मागणी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शांत प्रकाशजी जाटव यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाशजी जाटव यांनी यासंदर्भात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, देशातील सुमारे २७ लाख महिला कर्मचारी आशा व अंगणवाडी माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य,पोषण,माता- शिशु पालन आणि सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी करत आहेत.

मात्र प्रत्यक्षात या कार्यकर्त्यांकडून दररोज ८ ते १० तास काम करून घेतले जाते, तरीही त्यांना कामगाराचा दर्जा,किमान वेतन, ईएसआय,आरोग्य विमा, अपघात विमा,पेन्शन, ग्रॅच्युइटी यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत जाटव यांनी स्पष्ट केले की,नाव बदलून एखाद्या व्यक्तीस ‘स्वयंसेवक’ ठरवता येत नाही.नियमित काम आणि मोबदला मिळत असल्यास संबंधित व्यक्ती कामगारच ठरते,असे न्यायालयाचे स्पष्ट मत आहे.

भारतीय जनता मजदूर संघाने केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत 

  1. आशा,अंगणवाडी कार्यकर्त्या वसहाय्यकांना तात्काळ कामगाराचा दर्जा देण्यात यावा.
  2. त्यांचे मानधन किमान वेतन कायद्यानुसार पुनर्निर्धारित करावे.

सर्व कार्यकर्त्यांना ईएसआय,विमा,पेन्शन, ग्रॅच्युइटी व मातृत्व लाभ लागू करावेत.प्रत्यक्ष कामाच्या तासांनुसार कामाचे तास निश्चित करावेत.सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेली श्रमिक विषयक तत्त्वे पूर्णपणे लागू करावीत.

महिला कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय सरकार निश्चितपणे दूर करेल आणि त्यांना त्यांचा योग्य सन्मान व हक्क मिळवून देईल,असा विश्वासही संघटनेने व्यक्त केला आहे.दरम्यान भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शांत प्रकाशजी जाटव यांच्या भुमिकेचे भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव श्री.भाऊसाहेब घोडके,महाराष्ट्र सचिव श्री.धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव श्री. चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले असून लाखो स्वयंसेवकांना यामुळे लाभ मिळणार आहे याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!