मुंबई ते लातूर प्रवास आता ५ तासांत ; केज जवळून जाणाऱ्या ‘जनकल्याण’ महामार्गाचे संरेखन पूर्ण

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या कल्याण – लातूर ‘जनकल्याण’ महामार्ग प्रकल्पाला अखेर महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. महाराष्ट्रराज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून या ४५० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे संरेखन (Alignment) पूर्ण करण्यात आले असून,आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यते साठी पुढे पाठवला जाणार आहे.या प्रकल्पा मुळे सध्या १० ते १२ तास लागणारा मुंबई- लातूर प्रवास अवघ्या ५ तासांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
हा महामार्ग ठाणे,पुणे, अहिल्यानगर,बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांमधून जाणार आहे.विशेष म्हणजे,केज परिसरातून हा महामार्ग जाणार असल्याने बीड जिल्ह्यातील वाहतूक आणि आर्थिक हालचालींना मोठी चालना मिळणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील अंतर केवळ वेळेतच नव्हे तर विकासाच्या दृष्टीनेही कमी होणार आहे.
बीड-धाराशीव वादाचा ‘सुवर्णमध्य’महामार्गाच्या मार्गावरून बीड आणि धाराशीव जिल्ह्यांमध्ये काही काळ वाद सुरू होता.मात्र, एमएसआरडीसी ने या वादावर तोडगा काढत ‘सुवर्णमध्य’ साधला आहे.दोन्ही जिल्ह्यांना मुख्य महामार्गाशी जोडण्यासाठी अंतरबदल (interchange) मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना समान फायदा मिळणार आहे.
प्रवासात मोठी बचत
सध्या मुंबई ते लातूर प्रवासासाठी साधारण १० ते १२ तास लागतात. नवीन महामार्गामुळे हा वेळ थेट ५ तासांपर्यंत कमी होणार आहे.यामुळे इंधन खर्च कमी होईल व वेळेची मोठी बचत होईल तसेच व्यावसायिक वाहतूक जलद होईल
मराठवाड्याच्या विकासाला चालना
या महामार्गामुळे मराठवाडा भागात औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.बीड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये नवीन उद्योग,लॉजिस्टिक पार्क, वेअरहाऊस आणि व्यावसायिक केंद्रे उभी राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची जलद वाहतूक करता येणार असल्याने कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे.पुढील टप्पा एमएसआरडीसी कडून संरेखन पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम प्रस्ताव पुढील ८ ते १० दिवसांत राज्य सरकार कडे पाठवला जाणार आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जमीन संपादन प्रक्रिया सुरू होईल.टेंडर प्रक्रिया राबवली जाईल प्रत्यक्ष कामाला गती मिळेल
पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप
हा महामार्ग केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप मानली जात आहे.राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारा हा मार्ग भविष्यात आर्थिक कॉरिडॉर म्हणून विकसित होऊ शकतो.
केजसाठी विशेष महत्त्व
केज परिसरातून महामार्ग जाणार असल्यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती वाढेल.लघुउद्योगांना चालना मिळेल,जमीन मूल्यांमध्ये वाढ होईल
कल्याण -लातूर ‘जनकल्याण’ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी एक गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे.वेळ,पैसा आणि श्रम वाचवणारा हा मार्ग मराठवाड्याच्या विकासाचे नवे दार उघडणार आहे.आता राज्य सरकारच्या मंजुरी नंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



