डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न

केज/प्रतिनिधी
6 डिसेंबर रोजी भारतीय संविधान निर्माता व सामाजिक न्यायाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी विविध ठिकाणी आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील सर्वस्तरांतील नागरिक,महिला,युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या श्रद्धाभावाने उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
मोठ्या संख्येने महिला व मुलांनी उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाबाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोरही दीपप्रज्वलन करून शांततेचा संदेश देण्यात आला.पांढऱ्या वेशातील महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षवेधी होता.काही ठिकाणी निवासी शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांना अभिवादन केले.फळ्यावर ‘महापरिनिर्वाण दिन’ संदेश लिहून सामाजिक परिवर्तनातील डॉ. बाबासाहेबांचे योगदान विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
केज तालुक्यातील बऱ्याच गावात महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत आंबेडकर यांच्या आंदोलनाची परंपरा जपण्याची प्रतिज्ञा केली. गौतमबुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीक्षाभूमीच्या विचारांची प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. अनेक ठिकाणी युवकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून घरगुती पातळीवर श्रद्धांजली कार्यक्रम घेतला.
परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहून सामाजिक समानतेसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.सदरील कार्यक्रमात शिक्षक,पालक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.मुलांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित गीते, विचार आणि भाषणे सादर केली.बालकांच्या सहभागामुळे वातावरण प्रेरणादायी बनले.
समाजात समानता,बंधुता व मानवतावादाचा संदेश पसरवणे,संविधान मूल्यांचा प्रसार करणे, नव्या पिढीत सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे हा महापरिनिर्वाण दिनाचा संदेश म्हणावा लागेल.दि.6 डिसेंबरचा दिवस हा फक्त स्मरणाचा नसून,विचार अंगीकारण्याचा दिवस असल्याचा सूर सर्वत्र उमटल्याचे या विविध कार्यक्रमांवरून स्पष्ट झाले.



