
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जवळबन वीज उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत झाल्यामुळे परिसरातील आनंदगाव,सारणी व जवळबन शिवारातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आता दिवसभर मुबलक वीज पुरवठा उपलब्ध होत आहे.अशी माहिती उप केंद्राचे कनिष्ठ अभियंता प्रकाश वैरागे यांनी दिली.
रब्बी हंगाम सध्या जोमात सुरू असून ज्वारी,गहू, हरभरा,ऊस यांसारख्या पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे असते.पूर्वी अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना रात्री उशिरा शेतात जाऊन पाणी द्यावे लागे.अंधार,वन्यप्राण्यांचा धोका आणि अपघाताची भीती यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन वीज वितरण विभागाने जवळबन उपकेंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पातून आता थ्री-फेज वीज दिवसभर उपलब्ध होत असून सिंचनासाठी मोठी मदत होत आहे.यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.स्थानिकशेतकऱ्यांनी सांगितले की,पूर्वी रात्री पाणी देताना अनेक अडचणी यायच्या.आता दिवसा वीज मिळत असल्याने कामसोपे झाले आहे आणि धोका कमी झाला आहे.वीज पुरवठ्याचे नियोजन आणि तांत्रिक कामकाज सुरळीत पारपाडण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ डी.बी.पुरी, आर.जी.राठोड आणि एस.एस.फड यांचे सहकार्य लाभतअसल्याचे ही वैरागे यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीला बळकटी देण्याचा हा उपक्रम ठरत असून वीज वितरण कंपनीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या प्रकल्पामुळे शेती उत्पादन वाढीस चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे.



