चिंचोलीमाळी येथे रानडुक्करांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा कान फाटला तर महिलेचा पाय मोडला

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी शिवारात रानडुक्करांनी उच्छाद मांडला असून सोमवार दि.३० मार्च रोजी पहाटे आपल्या गॊठ्याकडे चाललेल्या शेतकऱ्यावर रानडुक्करने हल्ला करून धडक दिल्यामुळे शेतकरी पाण्याच्या हौदात पडून त्याचा कान फाटला.तर दुपारी ३-०० वाजण्याच्या दरम्यान ज्वारी काढणाऱ्या महिलेवर रानडुक्कराने हल्ला करून धडक दिल्यामुळे महिलेचा पाय मोडला आहे.त्यामुळे चिंचोलीमाळी शिवारा तील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
चिंचोलीमाळी शिवारातील उसाच्या फडात सध्या रानडुक्करांचा राहावा असून ऊसासह इतर रब्बी हंगामातील पिकांचेही ते नुकसान करीत आहेतशेतकरी बाळासाहेब ज्ञानोबा पवार हे रविवारी रात्री वरपगाव रस्त्या लगतच्या शेतात गेले होते. शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात बोअर घेत असल्याचे पाहून सोमवारी पहाटे ते आपल्या गॊठ्याकडे जात आसताना पाण्याच्या हौदाजवळ त्यांच्यावर अचानक रानडुक्कराने हल्ला केला.या हल्ल्यात त्यांना रानडुक्कराची जोराची धडक लागल्या मुळे ते शेजारीच असलेल्या पाण्याच्या हौदात कोसळले.त्यात शेतकरी बाळासाहेब पवार यांचा उजवा कान फाटल्याने त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात कानाला टाके घेऊन उपचार करण्यात आले.
तर सोमवारी दुपारी गावातील मनीषा अनिल बजगुडे ही महिला शेतात ज्वारी काढीत असताना अचानक आलेल्या रानडुक्कराने त्यांनाही जोराची धडक दिली. धडक त्यांच्या पायावर बसल्याने त्यांचा पाय मोडला आहे.त्यांच्यावर कळंब येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे शेतकऱ्यांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय रानडुक्करे पिकांची नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले असून वन विभागाने याची दखल घेऊन रानडुक्करांचा बंदोबस्त करावा.व जखमी शेतकऱ्यांसह महिलेस आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.



