सामाजिक

खरंच आठवणी पुसल्या जातील?

लातूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचार सभेत एका राजकीय पक्षाच्या जबाबदार नेत्यानेआपल्या भाषणात महाराष्ट्रराज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या लातूर मधील आठवणी शंभर टक्के पुसल्या जातील अशा प्रकारचे वक्तव्य केले आणि लातूरमध्ये सर्व लोकांच्या मनामध्ये असंतोष व अस्वस्थता निर्माण झाली.मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर त्या नेत्याने लगेच दूरदर्शनच्या माध्यमातून जाहीरपणे माफीही मागितली.

त्याचाच परिणाम म्हणून काल लातूर व बाभुळगाव बंदची हाक लोकांनी दिली.आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महान समाजसेवक व राजकीय नेते होऊन गेले,त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्तरावरील महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस, शहीद भगतसिंग,मदन लाल धिंग्रा,बाबू गेनू, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी,राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी तर महाराष्ट्र राज्य स्तरावरील यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,वसंत दादा पाटील,शरदचंद्र पवार,विलासराव देशमुख यासारखे अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्राच्या, राज्याच्या, समाजाच्या हितासाठी आणिसर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट केले.

त्यामुळेच तर आज त्यांचे फोटो बहुतेक घरामध्ये दुकानांमध्ये शासकीय अशासकीय व खाजगी कार्यालयामध्ये लावलेले आपल्याला दिसतील अनेक ठिकाणी तर त्यांना देवता मानून त्यांच्या फोटोची दररोज उदबत्ती लावून पूजाकरून व दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली जाते.आजही आपण अकलूजला गेलात तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य, सदस्य प्रवरा नगरला गेलात तर पद्मश्री विखे पाटील,बारामतीला गेलात तर माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार आणि लातूरला गेलात तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे फोटो बहुतेक घरात, दुकानात,शासकीय व अशासकीय तसेच अगदी खाजगी कार्यालयातही लावलेले आढळतील ते उगीच लावलेले नाहीत.

त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या आठवणी,त्यांच्या प्रतिमा त्यात्या भागातील लोकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.”विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर मधून१००% पुसून टाकणार” या वक्तव्यावर त्यांचे सुपुत्र माजी मंत्री अमित देशमुख व दुसरे सुपुत्र सिने अभिनेता ऋतिक देशमुख यांनी अत्यंत संयम राखून शांतपणे अत्यंत मोजक्या शब्दात दिलेल्या प्रतिक्रिया मधून त्यांच्या आई-वडिलांचे त्यांच्यावर झालेले संस्कार व घराण्याच्या संस्कृतीची झलक आपल्याला पाहायला मिळते. यासंबंधी अगदी एक ओळीत प्रतिक्रिया देताना विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख म्हणाले दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी घडलेल्या माणसांची नावे मनावर कोरली असतात लिहिलेलं पुसता येतं परंतु कोरलेले नाही.मी काही राजकारणी नाही सर्वसामान्य एक ज्येष्ठ नागरिक आहे.परंतु हे सर्व चाललेलं माझे मन व्यतीत झाले.

राजकारण कोणत्या स्तरापर्यंत जात आहे, त्याची पातळी आणखी किती खाली जाणार याची चिंता उगीचच मनाला लागून गेली म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच केला.कोणी विचारल्या शिवाय सल्ला देऊ नये असे म्हणतात.परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून राजकीय पुढार्‍यांना व इतर सर्वांनाच असा सल्ला देऊ इच्छितो की, बोलताना शंभर वेळा विचार करा आपल्या बोलल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरच होईल बुम रॅंग होईल का? उगीचच संतांनी लिहिले नाही की शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा,शस्त्राने झालेली जखम भरून होऊ शकते परंतु शब्दाने झालेली जखम वर्षानुवर्ष भरून येत नाही हे मात्र खरे.

विलासराव देशमुख हे फक्त लातूरची किंवा मराठवाड्याची अस्मिता नसून संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि या अस्मितेला ठेच लागली तर लोक सहन करणार नाहीत. विलासराव वर महाराष्ट्र ने किती प्रेम केले हे त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेल्या जमावाने सर्वांना दाखवून दिलेले आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे बंधू माननीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख सिने अभिनेता रितेश देशमुख यांच्या पाठीशी लातूर व परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी राहिलेली दिसते.

आम्ही शाळेत शिकत असताना आमचे शिक्षक फळ्यावर खडूने एक खूप उंच रेषा ओढायचे आणि त्याच्या शेजारी दुसरी अत्यंत खुजी रेषा ओढायची आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना समोर बोलावून प्रश्न विचारायचे की उंच रेषेपेक्षा खुजी रेषा मोठी करायची असेल तर काय करता येईल? प्रत्येक विद्यार्थी आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे व कुवती प्रमाणे विचार करून याचे उत्तर द्यायचा.एका मुलाने पुढे जाऊन लांब रेषा पुसून अत्यंत छोटी केली आणि सांगितले बघा गुरुजी छोटी रेषा आता मोठी झाली आहे.तर दुसऱ्या मुलाने मात्र पुढे जाऊन छोटी रेषा मोठ्या रेषा पेक्षाही उंच केली.

या दोन प्रकारच्या नकारात्मक व सकारात्मक प्रवृत्ती सर्वत्र आढळतील.म्हणून शेवटी एक जबाबदार नागरिक म्हणून एवढेच सांगू इच्छितो की,जर आपल्याला मोठे व्हायचं असेल तर मोठमोठ्या लोकांनी कोणती कामे केली? लोक त्यांना मोठे का म्हणतात ? लोकांनी त्यांना डोक्यावर का घेतले ? याचा अभ्यास करा व आपणही त्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्नकरा. इतरांना नावे ठेवून त्यांना कमी लेखून किंवा त्यांचे प्रतिमा पुसून आपण कधीही मोठे होऊ शकत नाही हे मात्र निश्चित.या निमित्ताने ज्या थोर नेत्यांनी राष्ट्रासाठी व राज्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद जय महाराष्ट्र

डॉ.आबासाहेब देशमुख, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!