केज तहसीलसमोर केविसंस चे 14 ऑगस्ट पासून बसडेपो,रिंगरोड व शेतकरी प्रश्नावर उपोषण

केज/प्रतिनिधी
केज येथे बसडेपो सुरु करा,केज शहरासाठी रिंगरोड (बायपास किंवा उड्डाणपुल यापैकी हे सोयीचे व फायद्याचे असेल ते),केज शहरातील शेतकऱ्यांना राज्य व केंद्राच्या सर्व कृषी योजनांचे लाभ तात्काळ सुरु करा तसेच संजय गांधी निराधार योजना लाभार्थीची दलालां कडून होणारी लूट थांबवण्यासाठी तहसील कार्यालयाने थेट त्यांच्याशीच पत्रव्यवहार करावेत या प्रमुख मागण्यासाठी केज विकास संघर्ष समिती च्या वतीने येत्या शुक्रवार दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपासून केज तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी दिली आहे.या बाबतचे निवेदन सर्व संबंधित विभागाला समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,केज येथे बसआगार सुरु करण्या साठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. यासाठी केज शहरात बीड रोड लगत साडेसात एकर जागा आरक्षित आहे.केज शहर सध्या खामगाव- पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या महामार्गाच्या जोडणीवर आहे.केज तालुका अंतर्गत एकशे दहा गांवे आहेत.दररोज हजारो प्रवाशी केज शहरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात.केज येथून बस गाड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी केज येथे बसडेपो सुरु करावा तसेच या जागेवर नवीन इलेक्ट्रिक बसगाडयांना लागणारे भव्य चार्जिंग सेंटर उभा करावे अशी मागणी समितीने राज्य परिवहन महामंडळा कडे निवेदनाद्वारे केली आहे.केज शहरातुन वरील दोन्ही प्रमुख महामार्ग भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एकत्र येऊन पुढे जातात.या अंतरात शहरातील वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सर्व प्रकारच्या वाहणा बरोबरच अवजड वाहनांचीसंख्या वाढली आहे.यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील महामार्गांवर अपघाताचे व सततची वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.म्हणून केज शहरासाठी तात्काळ रिंगरोड (बायपास किंवा उड्डाणपूल यापैकी केज शहरासाठी जे सोयीचे व फायद्याचे असेल त्यास मंजुरी द्यावी अशी मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.याव्यतिरिक्त केजच्या शेतकऱ्यांना केज येथे नगरपंचायत झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शासकीय कृषी योजनांचा लाभ नाकारण्यात आला आहे.हे अत्यंत चुकीचे आहे.शासनाने शेतकऱ्यांमध्ये भेद करू नये.विशेष म्हणजे राज्यात जेवढ्या नगरपंचायत व नगर परिषदा आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांवर तांत्रिक मुद्दे पुढे करून अन्याय केला जात आहे.तरी केज शहर नगरपंचायत अंतर्गत सर्वशेतकऱ्यांना तात्काळ सर्व शासकीय योजनांचे लाभ सुरु करावेत अशी मागणीही समितीने केली आहे.
समितीने केज तहसील अंतर्गत संजय गांधी व श्रावणबाळ निराधारांना मिळणाऱ्या लाभाची दलालांकडून होणाऱ्या लुटीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.यापूर्वी या सर्व लाभार्थीनाआपल्या अर्ज मंजुरी,त्रुटी किंवा अर्ज नाकारण्यात आल्यास सरळ तालुका प्रशासन पत्राद्वारे लेखी माहिती देत होते मात्र सध्या ही माहिती प्रशासनाकडून संबंधित लाभार्थीना पत्राद्वारे मिळत नसल्याने कांही दलाल लोक त्यांना चुकीची माहिती देऊन व दिशाभूल करून अवाजवी लूट करत आहेत.यासाठी सर्व लाभार्थीना तालुका प्रशासनाने सर्व माहिती लेखी पत्राद्वारेच कळवावी जेणेकडून त्यांची दलालां कडून लूट होणार नाही अशी मागणीही केज विकास संघर्ष समितीने संबंधित विभागाकडे केली आहे.
वरील सर्व मागण्या करिता केज विकास संघर्ष समितीच्या वतीने येत्या शुक्रवार दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून केज तहसीलकार्यालया समोर बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.केज वासियांनी या उपोषणास आपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले आहे. निवेदनावर नासेर मुंडे, शेषराव घोरपडे,इंजि. मोहनराव कराड, नारायण पंढरीनाथ बिक्कड,संपत वाघमारे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.



