शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने त्वरित लक्ष द्यावे —भारतीय किसान संघाची मागणी

केज/प्रतिनिधी
भारतीय किसान संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,तहसीलदार, केज यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले.शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिकआपत्ती आणि अपुऱ्या सरकारी योजनेच्या अंमलबजावणी मुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकटझाल्याने या निवेदनात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
- PM-ASHA योजनेअंतर्गत सोयाबीन,भात,कडधान्ये, मका, कापूस आदी पिकांची सरकारी खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत. शेतमालाची MSP(किमान आधारभूत किंमत) नुसार खरेदी करून माल परत न करता केंद्रावरच स्वीकारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
- अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदतनिधी वाटप करावे,अशी मागणी करण्यात आली.सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने नुकसान भरपाई त्वरित मिळणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
- पिक विमा योजनेतील बदल मागे घ्यावेत आणि गतवर्षीचेच नियम लागू करावेत,अशी मागणी संघाने केली आहे. प्रीमियम योजना बंद झाल्याने अनेकप्रामाणिक शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याचेही निवेदनात नमूद आहे.
- ई-पिक पाहणी अॕप मध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत.त्यामुळे दि.३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देऊन सर्वर आणि अॕप मधील त्रुटी दूर कराव्यात,तसेचआवश्यक असल्यास ग्रामपंचायती मार्फत माहिती घेऊन नोंद करावी,अशी मागणीही करण्यात आली.
- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सीसीआय हमीभाव खरेदीसाठी “कपास किसान अॕप वर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणी करण्याची मुदत वाढ देऊन त्याची खात्री शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठवावी,अशीही मागणी करण्यात आली आहे.
संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की,एप्रिलपासून अस्थिर पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.अशा वेळी सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन दिलासा द्यावा.या निवेदनावर शशिकांत गहाणे,धनंजय गव्हाणे,बालासाहेब शिंदे, विक्रांत शिंदे,भागवत शिंदे आदी किसान बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संघाने पुढे इशारा दिला की,सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोर्चे,धरणे आणि ठिय्या आंदोलनाचे टप्प्या टप्प्याने आयोजन करण्यात येईल.असा इशारा ही भारतीय किसान संघ बीड जिल्हा, केज तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे.



