खा.बजरंग सोनवणे मुंबई वरून आले अन् कपिलधारवाडीत गेले ;जमिनीला पडलेल्या भेगांची केली पाहणी, स्थलांतरित ग्रामस्थांशी संवाद साधत दिला धीर तातडीने सर्वेक्षण करण्या बाबत तहसीलदार सोबत चर्चा

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील कपिलधारवाडी परिसरात जमिनीतील भेगा व जमीन खचणे असे प्रकार घडल्याने नागरिक भयभीत आहेत.या गंभीर भूगर्भीय परिस्थितीवर तातडीने वैज्ञानिक भूगर्भ सर्वेक्षण करण्यात यावे, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी महा निदेशक,भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI),भारत सरकार ,नवी दिल्ली यांना दिलेले आहे.दरम्यान दि.७ रोजी खा.बजरंग सोनवणे हे मुंबई वरून बीड जिल्ह्यात दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी केजला न जाता कपिलधारवाडीत जात भेगांची पाहणी केली.
कपिलधारवाडी गाव व त्याच्या परिसरात(पाली ग्रामपंचायत) गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गंभीर भूगर्भीय स्थिती निर्माण झालेली आहे. अलीकडच्या काही दिवसांत या परिसरात जमिनीत मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले असून त्या झपाट्याने वाढत आहेत.अनेक ठिकाणी जमीन खचल्याचेही स्पष्ट दिसते. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतजमिनी, घरे,सार्वजनिक रस्ते इत्यादींना संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
या घडामोडींच्या स्वरूपा वरून हे स्पष्ट होते की,या भागात अनपेक्षित व धोकादायक भूगर्भीय बदल होत आहेत.या परिस्थितीच्या गांभीर्याचा तातडीने विचार करून भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (GSI) केंद्रा तील तज्ञांची टीम तातडीने पाठवून कपिलधारवाडी परिसर व आजूबाजूच्या भागाचा सखोल भूगर्भीय व भू-तांत्रिक सर्वेक्षण करावे, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी संबंधित विभागाला दिले आहे. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे विकासकामाच्या निमित्ताने दोन दिवस मुंबईत होते.ते मंगळवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात दाखल झाले.
जिल्ह्यात आल्यानंतर ते थेट कपिलधारवाडीत गेले. गावात पडलेल्या भेगा आणि पडझडीची पाहणी केली. त्याठिकाणी गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेले असून त्याठिकाणी महिला भगिनीची भेट घेतली.ग्रामस्थांशी संवाद साधत त्याना धीर दिला. आपण उपाय योजना साठी पत्रव्यवहार करत आहोत.तुम्ही काळजी करू नका,मी तुमच्या सोबत आहे,असा विश्वासही दिला.यावेळी बीडचे तहसीलदार सोबत होते.
भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडे अशी मागणी
सर्वेक्षणाद्वारे भूस्खलन व भेगा पडण्यामागील शास्त्रीय कारणे शोधावीत व तात्काळ प्रतिबंधक व सुधारात्मक उपाय सुचवावेत.आवश्यक असल्यास पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याशी समन्वय साधून बाधित क्षेत्रातील सुरक्षिततेची खात्री करावी आणि पुढील मानवी व पर्यावरणीय हानी टाळावी.या विषयाचे आपत्तीजन्य व तातडीचे स्वरूप लक्षात घेऊन या प्रकरणास प्राधान्य देऊन आपल्या प्रादेशिक तसेच केंद्रीय विभागांतून तातडीने कार्यवाही करावी असेही खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे.



