सामाजिक

पत्रकारांशी स्नेहसंबंध ठेवा ; प्रसारमाध्यमे हेच संघटन बळकट करणारे प्रभावी माध्यम – राम कुलकर्णी

धाराशिव/प्रतिनिधी

राजकारणात कार्य करत असताना पक्षाची भूमिका,नेतृत्वाने केलेली विकासकामे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोंहोचवायच्या असतील, तर प्रसारमाध्यमांची साथ अत्यंत महत्त्वाची ठरते.पत्रकारांशी स्नेह पूर्ण संबंध ठेवा,त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा ; याच माध्यमातून आपले कार्य प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचू शकते,असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.ते भारतीय जनता पक्षाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्याचे प्रशिक्षण शिबिर उदगीर येथील शिवम रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आले होते.यावेळी “प्रसारमाध्यमांची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राम कुलकर्णी म्हणाले पुढे की,वर्तमान काळ हा डिजिटल संवादाचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. पारंपरिक माध्यमां सोबतच सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणे काळाची गरज बनली आहे. संघटनेचे विचार, सरकारची विकासकामे आणि जनहिताच्या योजना प्रभावी पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्धी विभाग सक्षम,तत्पर आणि कार्यक्षम असणे आवश्यक आहे.प्रेस नोट तयार करणे,सोशल मीडियासाठी आकर्षक पोस्ट व घोषवाक्ये बनवणे,व्हिडिओ स्क्रिप्ट, ग्राफिक्स,पोस्टरडिझाईन यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊ शकतो,असेही त्यांनी सांगितले.फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब आणि व्हॉट्सॲप यांसारखी माध्यमे आज राजकीय संवादाची प्रभावी साधने बनली असून त्यांचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर व्हावा,असे आवाहन त्यांनी केले.

“सोशल मीडियावर पोस्ट करताना वैयक्तिक टीका टाळून केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहिताच्या योजनांची माहिती, सकारात्मक विचार आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका समाजापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे,”असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.प्रिंट मीडियाचा आजही सामान्य जनते मध्ये मोठा विश्वास असून स्थानिक दैनिके, ऑनलाइन पोर्टल्स आणि पत्रकारांशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“पत्रकार हे समाज आणि जनते मधील महत्त्वाचे दुवा आहेत.त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात सहभागी होणे, स्नेहसंबंध जपणे आणि सातत्याने संवाद ठेवणे यामुळेच संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेता येते,”असेही ते म्हणाले.“राजकारणात मोठे व्हायचे असेल,तर प्रसारमाध्यमांचा आधार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

माध्यमां शिवाय प्रभावी राजकारण करणे शक्य नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना माध्यमांशी सकारात्मक नाते निर्माण करण्याचे आवाहन केले. या शिबीरात माजी आ. श्री.सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,वर्ग प्रमुख ॲड.श्री.अनिल काळे, नितिन काळे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!