केकतसारणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी,रमेशराव आडसकर यांच्या हस्ते पुजन


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील केकत सारणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा अत्यंत पारंपारिक व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत कोणत्याही प्रकारचा कर्कश आवाज करणारा डॉल्बी न लावता ढोल- ताशे,लेझीम,टिपरे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला
सकाळी लवकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सजवलेल्या बैलगाडीतून महाराजांची प्रतिमा ठेवून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पोशाख परिधान केलेले युवक, लेझीम खेळणाऱ्या महिला व मुली,तसेच शिवकालीन वेशभूषेत सहभागी झालेले लहान मुले हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. जय भवानी,जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी आंबा साखर कारखान्याचे चेअरमन श्री.रमेशरावजी आडकर साहेब व ऋषीकेश भैया आडसकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा उल्लेख करून युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
सामाजिक ऐक्य, शिस्त आणि पर्यावरण पूरक सण साजरा करण्याचा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमात गावातील सर्व लहान मुले,महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तरुणांनी नियोजन, शिस्त व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.विशेष म्हणजे, ध्वनीप्रदूषण टाळत पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा घेतलेला निर्णय सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
संपूर्ण गावाने एकजुटीने आणि उत्साहाने जयंती साजरी करून समाजा पुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. केकतसारणी येथील ग्रामस्थांनी परंपरा जपत सुसंस्कृत आणिपर्यावरण पूरक पद्धतीने जयंती साजरी करून खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांना अभिवादन केले.यावेळी पंडितराव सावंत,बालासाहेब सपकाळ,बापुराव फुके, चंद्रकांत कोरडे,शरद गिराम यांच्या सह गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



