सामाजिक

नियोजित लातूर-कल्याण जनकल्याण द्रूतगती मार्ग यापूर्व नियोजित मार्गात बदल केल्यास तीव्र आंदोलन छेडणार! केज विकास संघर्ष समितीचा निर्धार व इशारा 

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व प्रशासनाच्या वतीने लातूर ते कल्याण हा जनकल्याण द्रूतगती मार्ग मार्ग लातूर -अंबाजोगाई – केज -बीड -जामखेड -अहिल्यानगर ते कल्याण असा मंजूर झालेला आहे.मात्र या मार्गाची मार्ग व ठिकाणे बदलून तो लातूर -कळंब -इट -खर्डा -जामखेड -अहिल्यानगर ते कल्याण करावा अशी शिफारस व मागणी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष पत्राद्वारे केली आहे.

विशेष म्हणजे हे पत्र सोशल मीडिया वर सर्वत्र व्हायरल झाले आहे. संबंधित पत्रात अगोदर मंजूर केलेला मार्ग हा अंतर व वेळ विचारात घेता अधिक खर्चिक असल्याचे सांगून नवीन मार्ग अधिक फायद्याचा असल्याचे नमूद केले आहे.हे शिफारस पत्र शासनाची दिशाभूल करणारे व अंबेजोगाई -केज – बीड च्या जनतेवर अन्याय करणारे आहे. संबंधित मंत्र्याने नवीन मार्गामुळे कृषी व इतर क्षेत्रातील व्यवसाय व उद्योग धंद्याना लाभदायक असल्याचे म्हटले आहे. तर मग बीड जिल्ह्यात वाळवंट आहे व इथे कृषी व व्यवसाय क्षेत्र नाही असे सांगायचे आहे का?

खरे पाहता शासनाने अगोदर मंजूर केलेला मार्गाने बीड जिल्ह्याची अंबेजोगाई,केज,बीड ही प्रमुख तालुका ठिकाणे व जिल्हा ठिकाण जोडले जाणार आहे.अगोदर नियोजित केलेला मार्ग विचारपूर्वक आखलेला असून केवळ राजकीय लाभ व श्रेय घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी सुचवलेला बदल महाराष्ट्र शासनाने स्वीकारू नये.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या मागणी व पत्राचा विरोध म्हणून येत्या सोमवार दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी केज विकास संघर्ष समिती केजच्या जनतेच्या सहभागाने सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करणार असून याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात दोन तास स्वयंस्फूर्तपणे केज शहर कडकडीत बंद ठेवण्याची हाक देत आहे. या आंदोलनाद्वारे समिती या मार्गात नवीन बदल करण्यास विरोध व अगोदर नियोजित केलेल्या मार्गालाच मंजुरी देण्याची मागणी करणार आहे.

याच वेळी समिती या भागातील सर्व आमदार, खासदार व जिल्ह्यातील इतर प्रमुख लोकप्रतिनिधी यांना निवेदनाद्वारे यासाठी विनंती करून या समस्येकडे लक्ष वेधून कार्यवाहीची मागणी करणार आहे.यासाठी आवश्यक मोठे जन आंदोलन उभा करण्याचा समितीने निर्धार केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!